भावविश्व

................तरंग मनाचे!

'मधला प्रवास'

                         प्रश्न हा मनुष्य जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पावलोपावली माणसाला प्रश्न पडतात, आणि हे प्रश्नच आयुष्याची नवनवीन उत्तरं शोधायला मदत करतात.ही उत्तरं जाणून घेण्यासाठी अंतर्मनाचा नादही ऐकायला हवा. या ऐकण्यावरच प्रत्येकाचं यशस्वी किंवा अयशस्वी होणं ठरतं.

                        आपलं मन सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण त्याला ठरवून दिलेल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया देत असतं. त्या मनाला तुम्ही आतापर्यंत घातलेल्या खतपाण्यावर ही प्रतिक्रिया अवलंबून असते. माणसाने नंतर केलेली प्रत्येक कृती हे त्या उत्तराकडे टाकलेलं पाऊलच होऊन जातं. हे उत्तर चांगलं की वाईट हेसुद्धा त्यावरच ठरतं.

                       प्रश्न जन्मासारखा असतो तर उत्तर मृत्युसारखं. त्या उत्तरानंतर पुन्हा नवीन प्रश्न,आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी केलेला प्रवास.  प्रश्न पडल्यावर तुमचं अंतर्मन तुम्हाला किती आणि कसं साद घालतं यावर त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याची वाट ठरते आणि त्यालाच 'जीवन' म्हणतात.

~मितेश शहा.

महामानव

                                    आयुष्यभर माणूस सवयींचाच गुलाम असतो. अगदी लहानपणापासून सवय माणसाला स्वत:चा गुलाम बनवते. लहान मुलांना काल केलेली गोष्ट आजही करावीशी वाटते. तेच बागेत जाणं, तेच टि.व्ही. समोर बसून जेवणं इ. काही दिवसांनंतर खेळायची सवय. सवयीनुसार काही गोष्टी घडत नसतील, तर लहान मुलांपासून अगदी केसं पांढरे झालेले आजोबाही चिडचिड करू लागतात.

                                   कुणाला पहिल्या दिवशी लागलेला चित्रपट बघायची सवय, कुणाला काहीही न करता घरातच बसण्याची, तर कुणाला रोज ठरलेल्या वेळेत घराबाहेर पडण्याची सवय. काहींना नुसतंच टिव्हीवर चैनल्स फिरवण्याची सवय, तर कुणाला यशस्वी होण्याची. काहीजणांना भूक लागली म्हणून नव्हे तर वेळ झाली म्हणून जेवण्याची सवय.अशा एक ना अनेक सवयी आपण आपल्या खांद्यावर घेऊन या जगात वावरत असतो. या सवयी पुर्ण होणार नसतील तर होणारी मनाची चलबिचल थांबवणं, हे सोपं काम नाही. मग त्यातूनच आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेणारेही भरपूर लोकं असतात.

                                    या सवयींच्या आवरणाने आपल्याला इतक्या विळखा घातलेला असतो, की रोज आपल्या सोबत वावरणारी व्यक्ती जेव्हा एक दिवस आपल्याला सोडून जाते, त्यानंतर काही दिवस तिची आठवण येणं ही सुद्धा एक सवयच, आणि काही दिवसांनी आपण आपल्या कामात मग्न होणं आणि ती व्यक्ती आठवणींच्या वलयाबाहेर जाणं, ही सुद्धा एक सवयच नाहीये का?

                                  त्या निर्मात्याने माणसाला बुद्धी दिली, विचार करण्याची शक्ती दिली, त्या विचारांच्या आधारावर पंख नसतांनाही कल्पनाविश्वात उडण्याचं बळ दिलं, पण त्यासोबतच एक प्रकारची आधीनतासुद्धा दिली. यात जो अडकून बसतो, तो मानवच रहातो आणि जो लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, यशस्वी होतो तो 'महामानव' होतो.

~मितेश शहा