सुरवात झालेल्या प्रत्येक गोष्टीचा अंत ठरलेलाच. निर्मात्याने सृष्टीचं निर्माणकार्य हाती घेतलं तेव्हाही हे चक्र चालवण्यासाठी एकमेकांविरोधी घटकांचा आधार घेतला. उदयास्त होणारा सूर्य आपल्याला याची रोज आठवण करून देत असतो.
मनुष्य जीवनातही आपल्याला याचं प्रतिबिंब दिसतं. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच गटात सहभागी असतो. शाळा, कॉलेज आणि इतरही अनेक मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आपण नेहमी राहतो. बेभान होऊन जगण्याची मजा लुटत असतांना मात्र आपण शेवटाकडे लक्ष देत नाही, त्यामुळेच कदाचित मित्रांचा सहवास संपल्यानंतर काही काळ जगणं अवघड होऊन जातं. अनपेक्षित घडणाऱ्या घटनांची तीव्रता जास्त असते.
प्रत्येक गोष्ट उलटून गेल्यानंतर मागे राहणारी हुरहूर मात्र फार अस्वस्थता देऊन जाते. शारीरिक दुखण्यापेक्षा मानसिक अस्वस्थता फार वाईट. आपण विचार जरी डोक्याने करत असलो तरी या विचारांना योग्य दिशा देणं हे मनाचं काम. अफाट ताकद असणाऱ्या मनाला मात्र ताळ्यावर ठेवण्याचं काम डोक्याचं. मन विचलीत झालं तर आपण आपली कार्यक्षमता हरवून बसतो. अशीच काहीशी अवस्था आपली अनेक प्रसंगांनंतर होते. त्यात विरह, दुःखद प्रसंगही आलेच. हे सगळं कोणालाही चुकलंय अशातला भाग नाही, परंतु यातुन लवकरात लवकर बाहेर पडून जो जीवनाची वाट चालू लागतो, तोच खरा जीवनाचा शिल्पकार ठरतो आणि जग त्याच्याकडे आदर्श म्हणुन पाहतं.
आपलं मन सभोवताली घडणाऱ्या घटनांची नेहमी अत्युच्च प्रतिमा निर्माण करत असतं. कुठल्या पार्टीत असतांना आपण तेथली मजा लुटत असतो, प्रेमाला सामोरे जातांना उत्स्फुर्त होतो, तर एखाद्या हॉस्पिटलमधुन फिरतांना मृत्यु मनुष्यजीवनाच्या किती जवळ असतो, याची जाणीव आपल्याला होते. स्वतः चालत असलेल्या वाटेचा शेवट माहिती असणे, हीच खरी 'जागृतावस्था' होय. जन्म एक उत्सव असेल तर मृत्युला महोत्सव करणं हेच आपलं ध्येय असायला हवं, त्यासाठी मात्र कायम जागृत राहणं महत्त्वाचं!!!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
प्रतिक्रिया द्या!