भावविश्व

................तरंग मनाचे!

गैरसोय


             शरीराचा एखादा अवयव दुखायला लागल्यावर आपण त्याच्याकडे जरा जास्तच लक्ष देऊ लागतो. आतापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या, आपल्या नकळत चालणारं काम अचानक चालेनासं होतं आणि आपण बिथरतो. कारण काय? तर, हव्या असलेल्या क्षणाला न झालेलं काम. वर्षानुवर्षे अगदी न चुकता काम करत आलेल्या त्या अवयवाची किंमत आपल्याठायी काहीच नसते.एखाद्यावेळी होणाऱ्या गैरसोयीशिवाय नेहमी होणाऱ्या सोयीची किंमत कळत नाही.

             तसंच काहीसं नात्यांचंही.....! आपण आजवर 'समजुन' घेत असलेली व्यक्ती अचानक 'वेगळं' काहीतरी वागायला लागते आणि आपल्याला अचानक आभास होतो.... ती व्यक्ती नेहमी आपल्या पाठीशी त्याच तन्मयतेने आणि निष्ठेने उभी राहिल्याची, मात्र आपणच प्रसंगी केलेल्या दुर्व्यवहाराची ...कुणीतरी नाराज होत असेल, आपल्याला टाळत असेल, तर आपण त्या व्यक्तीकडे अधिकच आकृष्ट होऊ लागतो..... कदाचित जगातल्या इतर सगळ्यांपेक्षाही....

             शरीरासारखंच नात्यांचीही काळजी घेणं आपल्या हातात नाही का? काहीतरी (बि)घडण्याच्या आत काहीतरी सावरणं, हेच जगणं नाही का?

~मितेश शहा

महासत्ता

          "कुठल्याही विद्येचा अभ्यास म्हणजे सरस्वतीची साधना, आणि प्रत्येक साधना योग्य रितीने पूर्ण झाल्याशिवाय अपेक्षित परिणाम मिळत नाहीत" असा साक्षात्कार आपल्याला पावलोपावली होतो. आपली प्राचीन शिक्षणपध्दती याच एका विचारावर कायम असल्याचे पुरावेही गोळा करणे तितकेसे अवघड नाही. अशाच विचाराने त्या काळात गुरू-शिष्याचं पवित्र नातंही व्यवस्थितरित्या सांभाळलं गेलं.
          संपूर्ण त्यागातून जीवन जगण्यास तयार झालेल्या त्या काळच्या तरुणाईने बरेच मैलाचे दगड रचले आणि आधुनिक तरुणाईकडूनही तशीच अपेक्षा ठेवली.ही अपेक्षा ठेवणं कधीच वाईट नव्ह्तं आणि नाही, किंबहुना या शिक्षणात प्राचीन काळातच भारताला महासत्ता बनवण्याची ताकद लपलेली होती. परंतु, दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही. शिक्षणाचं व्यापारीकरण याचं कारण ठरलं.
          आजचं व्यावसायिक शिक्षण हाच व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या हुतात्मा, क्रांतिकारक, महात्म्यांच्या नावाखाली चालणाऱ्या शिक्षणसंस्था जेव्हा 'त्या' नावाने सांगितलेली शिकवण विसरुन स्वैरपणे वागू लागतात तेव्हा सरस्वतीही दोन हात दुरच राहते.संस्थारुपी शेतात मग मनमानी नियम तयार करवून घेऊन 'अर्थ'पूर्ण निर्णय घेतले जातात आणि शिक्षण सोडून इतर गोष्टी विद्यार्थीरुपी रोपांभोवती बांडगुळं म्हणुन वाढतात. यामधुन रस्ता शोधता-शोधता विद्यार्थ्यांची अर्ध्याधिक शक्ती खर्च होते आणि दरवर्षी शिक्षणपध्दती तिने ठरवलेल्या नियमांनुसारच नापास होते! मग पोस्टर रुपाने प्रत्येक भिंतीवर लावलेले आणि बऱ्याच वेळी धुळीने वेढलेले जागतिक महासत्तेचे स्वप्न धुसर होऊ लागते आणि त्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या ऊराशी बाळगुन ठेवलेल्या भविष्यरुपी स्वप्नांचे फुगेही फुटतात,मात्र हातात उरतात ते फक्त आतापर्यंत शिकण्यासाठी केलेल्या धडपडीचे अवशेष! दरवर्षी घडणाऱ्या अशा अनेक घटनांतुन व्यावसायिकांचा व्यवसाय  पुर्ण होत असेल कदाचित, पण विद्यार्थ्यांचं आणि पर्यायानं देशाचं भविष्य टेबलाखालून घडत नाही, हेसुध्दा तितकंच खरं!!
        बऱ्याच ठिकाणी भौतिक अवस्थेला प्रमाण मानून गुणवत्तावाढीचे प्रयत्न सक्तीतुन होतांना दिसतात, परंतु मानसिक अवस्था त्याहूनही कित्येक पटीने अधिक महत्त्वाची आहे आणि हीच बाब दुर्लक्षित करण्यात येते. गुणवत्ता सक्तीतुन तयार करण्याची गोष्ट नव्हे तर आत्मविश्वास पेलण्याची मानसिक शक्ती तयार करवून घेण्यात आहे, हा विचार समाजात रुजला, बहरला तरच भारताची वाटचाल महासत्तेकडे होऊ शकते.

महोत्सव

                     सुरवात झालेल्या प्रत्येक गोष्टीचा अंत ठरलेलाच. निर्मात्याने सृष्टीचं निर्माणकार्य हाती घेतलं तेव्हाही हे चक्र चालवण्यासाठी एकमेकांविरोधी घटकांचा आधार घेतला.  उदयास्त होणारा सूर्य आपल्याला याची रोज आठवण करून देत असतो.
                     मनुष्य जीवनातही आपल्याला याचं प्रतिबिंब दिसतं. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच गटात सहभागी असतो. शाळा, कॉलेज आणि इतरही अनेक मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आपण नेहमी राहतो. बेभान होऊन जगण्याची मजा लुटत असतांना मात्र आपण शेवटाकडे लक्ष देत नाही, त्यामुळेच कदाचित मित्रांचा सहवास संपल्यानंतर काही काळ जगणं अवघड होऊन जातं. अनपेक्षित घडणाऱ्या घटनांची तीव्रता जास्त असते.
                     प्रत्येक गोष्ट उलटून गेल्यानंतर मागे राहणारी हुरहूर मात्र फार अस्वस्थता देऊन जाते. शारीरिक दुखण्यापेक्षा मानसिक अस्वस्थता फार वाईट. आपण विचार जरी डोक्याने करत असलो तरी या विचारांना योग्य दिशा देणं हे मनाचं काम. अफाट ताकद असणाऱ्या मनाला मात्र ताळ्यावर ठेवण्याचं काम डोक्याचं. मन विचलीत झालं तर आपण आपली कार्यक्षमता हरवून बसतो. अशीच काहीशी अवस्था आपली अनेक प्रसंगांनंतर होते. त्यात विरह, दुःखद प्रसंगही आलेच. हे सगळं कोणालाही चुकलंय अशातला भाग नाही, परंतु यातुन लवकरात लवकर बाहेर पडून जो जीवनाची वाट चालू लागतो, तोच खरा जीवनाचा शिल्पकार ठरतो आणि जग त्याच्याकडे आदर्श म्हणुन पाहतं.
                     आपलं मन सभोवताली घडणाऱ्या घटनांची नेहमी अत्युच्च प्रतिमा निर्माण करत असतं. कुठल्या पार्टीत असतांना आपण तेथली मजा लुटत असतो, प्रेमाला सामोरे जातांना उत्स्फुर्त होतो, तर एखाद्या हॉस्पिटलमधुन फिरतांना मृत्यु मनुष्यजीवनाच्या किती जवळ असतो, याची जाणीव आपल्याला होते. स्वतः चालत असलेल्या वाटेचा शेवट माहिती असणे, हीच खरी 'जागृतावस्था' होय. जन्म एक उत्सव असेल तर मृत्युला महोत्सव करणं हेच आपलं ध्येय असायला हवं, त्यासाठी मात्र कायम जागृत राहणं महत्त्वाचं!!!

जरा जपुन!

                        सहनशील माणसाचा अंत पाहू नये. सहनशील व्यक्तीचं मन एखाद्या नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यासारखं असतं. त्यात कितीही वेगाने येणारी दु:खं, त्रास बऱ्याच काळापर्यंत अडवली जातात. परंतु त्याच्या क्षमतांनाही किनारे असतात.

                        एकदा मर्यादा ओलांडल्यावर, नदीचा बांध फुटल्याप्रमाणे, अडवलेलं पाणी जसं आधीच्या वेगापेक्षा कितीतरी अधिक पट वेगाने वाहू लागतं तसंच, सहनशील व्यक्तिमत्त्वाचा माणूस आक्रमक होतो, तो कुणालाही जुमानत नाही. आतापर्यंत न पाहिलेल्या त्याच्या स्वरुपाचं दर्शन जगाला होतं. नेहमी रागीट दिसणारा मनुष्यही त्याच्यासमोर टिकाव धरु शकत नाही. त्याच्या मनातल्या जुन्या, कुठल्यातरी कोपऱ्यात दडवुन ठेवलेल्या सगळ्या भावना जागृत होतात आणि जगातल्या कुठल्याही शक्तीला सामोरं जाण्याची ताकद त्याच्यात येते.

                       ही प्रतिक्रिया म्हणजे राग कधीच नसतो. हा असतो संताप..!
                       मनुष्याच्या थेट ह्रदयातुन येणारी भावना कधीच अपुरी नसते. या भावनेचे प्रेम,संताप,आशीर्वाद असे वेगवेगळे स्वरुप असतीलही, परंतु, प्रत्येक रुपात प्रचंड उलथापालथ घडवण्याचे सामर्थ्य सामावलेले असते.

'मधला प्रवास'

                         प्रश्न हा मनुष्य जीवनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पावलोपावली माणसाला प्रश्न पडतात, आणि हे प्रश्नच आयुष्याची नवनवीन उत्तरं शोधायला मदत करतात.ही उत्तरं जाणून घेण्यासाठी अंतर्मनाचा नादही ऐकायला हवा. या ऐकण्यावरच प्रत्येकाचं यशस्वी किंवा अयशस्वी होणं ठरतं.

                        आपलं मन सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण त्याला ठरवून दिलेल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया देत असतं. त्या मनाला तुम्ही आतापर्यंत घातलेल्या खतपाण्यावर ही प्रतिक्रिया अवलंबून असते. माणसाने नंतर केलेली प्रत्येक कृती हे त्या उत्तराकडे टाकलेलं पाऊलच होऊन जातं. हे उत्तर चांगलं की वाईट हेसुद्धा त्यावरच ठरतं.

                       प्रश्न जन्मासारखा असतो तर उत्तर मृत्युसारखं. त्या उत्तरानंतर पुन्हा नवीन प्रश्न,आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी केलेला प्रवास.  प्रश्न पडल्यावर तुमचं अंतर्मन तुम्हाला किती आणि कसं साद घालतं यावर त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याची वाट ठरते आणि त्यालाच 'जीवन' म्हणतात.

~मितेश शहा.